ऐसे कैसे झाले भोंदू

       आपण जसे नाहीत, तसे दाखविण्याची प्रत्येकाला हौस असते. जे आहे, लपवायचं आणि नाही, ते भासवायचं यावरच कितीतरी रूपये खर्च होत आहेत. साधं व्हाट्सअपला स्टेटस ठेवतानाही फिल्टर लावून ठेवतात. मुळात फिल्टर लावूनच काढलेला फोटो, सोशल मिडीयावर अपलोड करताना पुन्हा इतक्या चाळण्या लावतात, की तो वेगळाच काहीतरी वाटतो. एखाद्याचा डीपी पाहून त्याला प्रत्यक्षात आपण ओळखूच, याची काहीही शाश्वती नाही. आधार कार्डवरच्या फोटोइतका कोणी वाईट दिसत नसतो, हे खरं आहे, पण मग डीपीइतका सुंदर असतो का?
Eise-kaise-zale-bhondu

       ही सगळी देखाव्याची दुनिया आहे. जी तुम्हाला जीवापलीकडे जीव लावते, ती कधीच ‘आय लव्ह यू’ म्हणत नाही. जी तुमचं स्टेटस् पाहून मागे लागलेली असते, तिच्या नुसत्या स्मायली वाचून तुम्ही बेजार होता. ‘दिसतं तसं नसतं’ नव्हे, ‘दाखवलं जातं तसं मुळीच नसतं’, असं म्हणायची वेळ आलेली आहे. माणूस आतून बाहेरून सारखाच असावा. त्याचीच संगत करावी. ढोंगी व्यक्तीच्या सावलीलाही उभं राहू नये. तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।।
         खरा भक्त कधी लोकांसमोर येत नाही. ढोंगी कोणीतरी पाहेपर्यंत देवालाही हात जोडत नाही. देव आपल्याला पाहतोय, यावर त्याचा विश्वासच नसतो. काया, वाचा आणि मनाचं तप यावर आपण मागील लेखांत चिंतन केलं. परंतु तपातही सात्विक, राजस आणि तामस आदी प्रकार आहेत. लोकांनी फक्त आपलं कौतुक करावं, म्हणून जे केलं जातं, ते तप नसतं, तपाचा देखावा असतो. मानमहत्वासाठी हपापलेले लोक फोटोमध्ये सुध्दा कॅमेर्याचा मुख्य फोकस कसा आपणावरच राहील, याचीच काळजी घेतात.
          सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत । क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्।। गीता १७.१८।। कोणीतरी सत्कार करावा, मान द्यावा म्हणून जे तपाचं ढोंग केलं जातं, ते राजस तप. त्याचा फायदाही मिळत नाही आणि ते टिकतही नाही. एखादी कृती करणारा- जो करतो, ज्याच्यासाठी करतो, त्याचाही विचार न करता उलट ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही, त्या बघ्यांसाठी करत असेल, तर ती निरर्थक आहे. धन आणि मानावर डोळा ठेवून केलेल्या कृतीला ढोंग म्हणतात, तप नव्हे. माऊली म्हणतात, हें असो धनमानीं आस । वाढवूनि तप किजे सायास। तै तेचि तप राजस। बोलिजे गा।। ज्ञा. १७.२४७।।
रमेश वाघ, नाशिक 
संपर्क - 9921816183
Eise-kaise-zale-bhondu


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या