अशा एका स्थळाची कल्पना करा. जिथे उत्तम सरोवर, सरोवरात लाटा नाहीत. आकाश निरभ्र. चहोबाजूंनी चंदनाचं मनोरम उद्यान. त्यामध्ये सापाचा वास नसावा. चंद्र आपल्या पूर्णावस्थेत असावा. अशा ठिकाणी एखादा सम्राट निश्चिंत, निवांत बसलेला असावा. तो सम्राट तुम्ही असावेत. अशावेळी तुमच्या मनाची जी भावावस्था असेल, त्याला म्हणतात मनाची प्रसन्नता. प्रकाश असावा, पण ताप नसावा. रस असावा, पण भरडपणा नसावा. आकाश असावं, पण पोकळी नसावी. आपण आपल्यातच दंग असावं. जसं थंडीमुळे थंडीला थंडी वाजत नाही. तसं मनाच्या चंचलत्वाने मनाला त्रास होऊ नये. हे सौम्यत्व.
बोलताना फक्त शास्त्रचर्चा करावी, हा वाणीच्या तपाचा नियम. परंतु त्यासाठीही तोंड उघडू नये. मीठाचा पाण्याला स्पर्श झाल्यावर त्याचं मीठपण जातं. तस मन इतकं स्व-स्वरूपात विलीन व्हावं की, मनाचा मनपणा नाहीसा व्हावा. दिसेल त्या विषयामागे धावणार्या इंद्रियांना असं आकळावं, की त्यांची धावण्याची भावना खलास व्हावी. धावणे हा इंद्रियांचा स्वभावच आहे. इच्छित गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात मोठेपणा नाही. चुकीच्या दिशेने जाणार्या इंद्रियांची धाव थांबविण्यात पुरूषार्थ आहे.
ओठात एक आणि पोटात एक अशी अवस्था असू नये. जे ओठी तेच पोटी, अशी वागण्या-बोलण्याची रीत असावी. बोलताना काही गोष्टी उघडपणे बोलल्या, तर बरं दिसत नाही म्हणून लोक बोलत नाहीत. पण मनात मात्र जे बोलू नये, ते विचार आल्याशिवाय राहत नाहीत. मनाचे सर्व भाव अत्यंत शुध्द आणि परिपूर्ण असावेत. वरील लक्षणांनी युक्त अशा प्रकारचे जे मन असेल, ते तपस्वी मन होय. माऊली म्हणतात, काय बहू बोलो? अर्जुना । जैं हे दशा ये मना । तैं मनोस्तपोभिधाना । पात्र होय ती ।। ज्ञानेश्वरी १७.२३६।।
रमेश वाघ, नाशिक
संपर्क - 9921816183

0 टिप्पण्या