माणूस जन्माला आल्यानंतर त्याला कळायला लागलं तेव्हापासून स्वत:साठी काही करतो की नाही, हीच महत्वाची शंका आहे. त्याची प्रत्येक कृती दुसर्यांच्या दृष्टीकोनातून होत असते. अगदी लग्नाचा ड्रेस घ्यायचा, तरी तो पूर्वी मित्रांच्या सल्ल्याने घेतला जायचा. आता मित्रांची जागा भावी पत्नीने घेतलेली आहे, इतकाच काय तो बदल. माणसाच्या भौतिक कृती दुसर्यांना दाखविण्यासाठी केल्या जातात, हे एक वेळ ठीक. परंतु अध्यात्मिक गोष्टी सुध्दा कोणाला तरी दाखवून त्याच्याकडून कोरड्या स्तुतीच्या चार शब्दांची अपेक्षा केली जाते. तेही एकवेळ जाऊद्या. पण आपल्या साधनेने इतरांना दुख व्हावं, म्हणून अघोरी उपाय करणारे लोक समाजात आहेत. याला गीता तामस तप म्हणते. मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः । परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १७. १९ ॥
दुर्जनांची प्रत्येक कृती विपरीत
असते. त्यातून समाजाची हानीच होते. जी गोष्ट ज्या हेतूसाठी आस्तित्वात आली, तिचा वापर
त्या हेतूच्या नेमक्या उलट्या प्रकारे करतात. शास्त्रकार सांगतात, विद्या
विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परिपीडनाय । खलस्य साधोर् विपरीतमेतद् ज्ञानाय
दानाय च रक्षणाय ॥ विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी,
आणि शक्ती दुबळ्यांच्या रक्षणासाठी वापरावी ही शास्त्राज्ञा आहे. परंतु तमोगुणी
लोक एकतर अज्ञानीच असतात, पण अपघाताने विद्या मिळाली, तर तिचा वापर वाद
घालण्यासाठी करतात. धन आलं की मदोन्मत होतात. अंगात ताकद आली, की दिसेल त्याला
आपल्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवितात.
प्रसंगी
आपल्याला त्रास झाला तरी चालेल. दुसर्याला सुख मिळायला नको, अशी यांची धारणा असते.
आपल्याला त्रास करवून घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी
तपे केली जातात, त्याचं तामस तप असं ज्ञानेश्वरीनं वर्णन केलेलं आहे. असा प्रकार शेवटी कोणाच्याच भल्याचा नसतो. त्याच्यामुळे
स्वत:सोबत समाजाचाही अध:पात होतो.
असे
लोक डोंगरावरून सुटलेल्या दगडासारखे असतात. अंगाच्या वजनाने आणि उताराच्या गतीमुळे
दगड आपण स्वत: फुटून तुकडे तुकडे होतोच, शिवाय जे काही त्याच्या मार्गात आड येईल,
त्याचा चुराडा करतो. तसे हे लोक असतात. स्वत:चा नाश करवून घेतातच. परंतु आपल्यासोबत
दुसर्यांचा नाश होत असेल, तर त्यांना स्वर्गातल्या बाहात्तर अप्सरा मिळाल्याचा
आनंद होतो. माऊली म्हणतात, आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । कां
आड जालियातें रगडा । करी जैसा ॥ ज्ञा. १७-२६०॥
रमेश वाघ, नाशिक- ९९२१८१६१८३

0 टिप्पण्या