
eikata yayala have
ज्ञानेश्वरी
संवादफळनिधान आहे. ज्या-ज्या ग्रंथांनी जागतिक तत्त्वज्ञानाला आकार दिला, ते
संवादातून आकाराला आलेले आहेत. बोलणाऱ्याची भाषा कानामनाने ऐकणारा श्रोता
मिळाल्यानंतरच ज्ञानाचा साठा असणारे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. संवादातून काहीतरी
निष्पन्न व्हावं. आमचा संवाद एकतर निष्फळ असतो, नाहीतर वायफळ. आजकाल बोलघेवड्यांची
प्रंचंड गर्दी आहे. ऐकायला कोणालाच
वेळ नाही. ऐकणं म्हणजे समृध्द होणं असतं, हा संस्कार करायला आपण विसरतो आहोत. घरात
साधं बोलायला गेलं, तरी प्रत्येकजण आपलंच घोडं दामटत असतो.
कोणतरी डोळे पुसणारं असेल, तरच
रडण्याला अर्थ आहे. ऐकणारा असेल, तर बोलण्याला अर्थ आहे. सहजें तरी अवधारा ।
वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥
लक्षपूर्वक ऐकणारा कोणी असेलतर बोलणाऱ्याच्या बोलण्यालाही अर्थ प्राप्त होतो.
अक्षरांमधून सिध्दांत प्रकट होतात. लक्षपूर्वक ऐकणं हे व्याख्यानाचं खाद्य आहे.
ऐकणाराच नसेल, तर बोलणारा कितीही विद्वान असला, तरी त्याचा फायदा नसतो.
चांगला श्रोता मिळत नाही, ही देवाचीही
तक्रार आहे. पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे ।परी काय कीजे
न जोडे । पुसतें ऐसें ॥ कुठेही जा प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय.
त्यांच्याकडे खरंच काही सांगण्यासारखं असतं म्हणून नव्हे, तर त्यांचं कोणीच ऐकूनच
घेत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. घरात संवाद हरवलाय, तसं बाहेरही झालंय. जो तो
सोशल मिडीयावर आपली स्टोरी आणि स्टेटस् शेयर करतोय. दुसऱ्याची कोणाला पाहायचीच
नाहीये. तुम्ही कितीही महत्त्वाची बातमी टाका बघणारे एक हजार असतील, त्यावर
प्रतिक्रिया दहा पण येत नाहीत. याचा अर्थ ते बघून पुढे जातात, पण पाहत नाहीत.
समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकलं, तर त्यातून
दोघांच्याही लाभाचं काही निष्पन्न होऊ शकतं. गीता
अर्जुनाच्या लक्षपूर्वक ऐकण्यातून निर्माण
झालेली आहे. अवधानपूर्वक ऐकणारा कोणी मिळाला, तर ते बोलणाऱ्याचं भाग्य.
स्वच्छ पुसून ठेवलेला आरसा समोर आला, तरच आपल्याला उत्तम प्रतिबिंब दिसतं. ऐकणारा
आरशासारखा निर्मळ असला, तरच बोलण्यातला अपेक्षित भाव त्याच्या कानातून मनापर्यंत
पोचतो. अर्जुन अशा प्रकारचा श्रोता होता, म्हणून तुम्हा आम्हाला गीता मिळाली. जैसा
आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी
॥ज्ञा.१२.१५.४५१ ॥
रमेश वाघ, नाशिक.
संपर्क- ९९२१८१६१८३

0 टिप्पण्या